Monsoon Update : मित्रांनो महाराष्ट्रात काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसानं पुन्हा आपली जोरदार उपस्थिती नोंदवली आहे. सुरुवात टप्प्याटप्प्यानं झाली असली, तरी आता पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईतही पावसाच्या सरी रेंगाळू लागल्या असून, कोकण आणि घाटमाथ्याचे भाग तर दमदार पावसात भिजत आहेत.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
सध्या कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हवामान विभागाने या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. हे अलर्ट म्हणजे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असून, हवामान अचानक बदलू शकते.
मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची चिन्हं
कोकण आणि घाटमाथ्याच्या तुलनेत पावसाचा जोर थोडा सौम्य असला, तरी मराठवाडा आणि विदर्भातही दमदार सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे या भागांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. या अलर्टमुळे स्थानिक प्रशासनाला सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पुढील काही दिवस पावसाचे, हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार 23 ते 27 जुलैदरम्यान राज्यात विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. दक्षिण ओडिशावर एक चक्राकार स्थिती तयार झाली असून, कर्नाटक ते आंध्र प्रदेश दरम्यान एक ट्रफ लाईन सक्रिय झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल हवामान तयार झालं आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र होणार सक्रीय?
24 जुलैच्या आसपास बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचं क्षेत्र सक्रीय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याचा परिणाम कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाट भागांवर होईल, असंही हवामान विभाग सांगतो. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, या कालावधीत वाऱ्याचा वेगही ताशी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत वाढू शकतो. त्यामुळे वादळी स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.
मच्छीमारांसाठी महत्त्वाचा इशारा
पावसाचा जोर वाढण्याची चिन्हं दिसत असल्याने उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी आणि दक्षिण महाराष्ट्र-गोवा समुद्रकिनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वारे आणि उंच लाटा येण्याची शक्यता लक्षात घेता, मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.